जळगाव - शहरातील पिंप्राळा हुडको भागातील एका सुशिक्षित कुटुंबातील 11 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुलीच्या मामाने तिच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करत रामानंदनगर पोलिसात गंभीर स्वरुपाची तक्रार केली आहे. 'मुलगी अपशकुनी असल्याचे मानून तिचे वडील जन्मापासून तिचा अनन्वित छळ करत होते. तिचा घातपात झाला असावा', अशी तक्रार मामाने केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन मंगळवारी पोलिसांनी दफनविधी झालेला मुलीचा मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला. मृतदेहावर बुधवारी (28 एप्रिल) शवविच्छेदन होणार आहे. मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई होणार आहे.
संशयास्पद मृत्यू झालेल्या मुलीचे वडील हे व्यवसायाने केमिस्ट आहेत. तिचे एक काका डॉक्टर तर दुसरे वकील आहेत. तिचा जन्म झाला, त्यावेळी तिच्या आजीचे निधन झाले होते. त्यानंतर 2 वर्षांनी वडिलांच्या मेडिकल दुकानाला आग लागली होती. या दोन्ही घटनांमुळे तिच्या वडिलांनी ती अपशकुनी असल्याचा समज केला होता. तेव्हापासून डांबून ठेवणे, जेवण न देणे, मारहाण करणे अशा प्रकारे तिचा छळ सुरू होता. तिची अवस्था बघवली जात नसल्याने तिच्या आजी-आजोबांनी तिला आजोळी अमळनेर येथे आणले होते. याठिकाणी ती 2 ते 3 वर्षे राहिली. नंतर भेटण्याच्या बहाण्याने तिला आई-वडिलांनी परत घरी आणले होते. सध्या ती जळगावात पिंप्राळा-हुडकोत आई-वडिलांकडे राहत होती.
2 दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू, परस्पर दफनविधी-
2 दिवसांपूर्वी या मुलीचा पहाटे संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या वडिलांनी दोन्ही भाऊ आणि परिसरातील काही लोकांच्या उपस्थितीत तिचा दफनविधी केला. दरम्यान, मुलीचे निधन झाल्यानंतर तिचे कुटुंबीय जळगाव सोडून बाहेरगावी गेले. ही बाब शेजाऱ्यांना खटकली. त्यांनी मुलीच्या आजोळच्या लोकांना घटनेची माहिती दिली. तेव्हा तिचे आजी-आजोबा व मामा जळगावात आले. यानंतर मामाने पोलिसात तक्रार दाखल केली.
धुळ्यातून कुटुंबीयांना घेतले ताब्यात-
हे प्रकरण संशयास्पद असल्याने पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून तिच्या कुटुंबीयांना धुळ्यातून ताब्यात घेतले. पोलिसांनी नातेवाईक व काही लोकांची चौकशी केली. त्यात प्रत्येकाच्या जबाबात भिन्नता होती. म्हणून संशय बळावल्याने नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे म्हणून शवविच्छेदन होणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली.