जळगाव - जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्य सरकारने तत्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव तसेच पाचोरा तालुक्यातील काही भागात 2 दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसासोबत चक्रीवादळ देखील होते. त्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा, गहू तसेच मका पिके अक्षरशः जमिनदोस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे पाचोरा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. पाचोऱ्यात हजारो हेक्टरवरील मका जमिनदोस्त झाला आहे. त्याचप्रमाणे कापणीवर आलेला हरभरा तसेच गव्हाचे पीक देखील मातीमोल झाले आहे. चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यात देखील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील शासनाकडून अद्याप नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. शासनाने तत्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. 2 दिवस उलटून देखील पंचनामे सुरू नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला.
हेही वाचा - मोबाईल वापरास मज्जाव केल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या
खरिपात शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नव्हते. शेतीत टाकलेला खर्च निघाला नसल्याने शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर होती. मोठ्या हिंमतीने शेतकरी रब्बीला सामोरे गेले. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने रब्बीचा हंगाम जोमात होता. मात्र, आता हरभरा, गहू पिके काढणीला असताना अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाने घात केला. अशा परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे. मका, दादर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.
विजेचे खांब, वृक्षांची पडझड-पाचोरा तालुक्याला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब तसेच वृक्षांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी वृक्ष विजेच्या तारांवर कोसळल्याने नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरण कंपनीकडून अद्यापही दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आलेली नाहीत. वृक्ष कोसळल्याने शेतरस्ते देखील बंद झालेले आहेत.