जळगाव - सुशिक्षित बेरोजगार तरुणाला जल शुद्धीकरणाचा प्लांट टाकण्यासाठी कर्ज व सबसिडी मिळवून देण्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा उद्योग केंद्रातील प्रकल्प अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. मंगळवारी (दि. 15 जून) दुपारी ही कारवाई झाली. आनंद देविदास विद्यागर (वय 50 वर्षे, रा. अजय कॉलनी, रिंगरोड, जळगाव), असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
काय आहे प्रकरण..?
भुसावळ शहरातील 35 वर्षीय बेरोजगार तरुणाने पीएमईजीपी या शासनाच्या योजनेंतर्गत 30 लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी प्रकरण तयार केले होते. हे प्रकरण बँकेला पाठवण्याच्या मोबदल्यात विद्यागर याने 10 हजार रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
पंचांसमक्ष घेतली लाचेची रक्कम
मंगळवारी (दि. 15 जून) लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या पथकाने विद्यागर याच्या कार्यालयात सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे तक्रारदार याने विद्यागर याच्या हातात लाचेची रक्कम दिली. यानंतर सापळा रचलेल्या पथकातील अधिकाऱ्यास फोन करुन 'ताई माझे काम झाले आहे, मी येतो', असा निरोप दिला. लागलीच पथकाने विद्यागर याला रंगेहात अटक केली. त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - जळगावातील सरकारी वकील राखी पाटील खून खटल्याची संशोधनासाठी निवड