जळगाव - पती व पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना जळगाव शहरात घडली आहे. भाजीपाला विक्रीच्या व्यवसायात फायदा व्हावा म्हणून एका नराधम पतीने आपल्या पत्नीवर मित्राला अत्याचार करायला लावल्याची संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी पीडित पत्नीच्या फिर्यादीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील पीडित महिलेचे माहेर धुळे येथील आहे. काही वर्षांपूर्वी तिचे जळगाव शहरातील वाल्मिक नगरातील एका छोट्या व्यावसायिकाशी लग्न झाले आहे. त्यांना दोन मुलेही आहेत. या घटनेसंदर्भात पीडित महिलेने पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात तिच्या पतीचा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे पीडित महिलेच्या पतीने त्याच्या एका मित्रासोबत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी पती-पत्नी मुलांना सोबत घेऊन त्या मित्राच्या पिंप्राळा-हुडको परिसरातील एका घरात 1 मे 2020 पासून भाड्याने राहत होते.
भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू असताना 8 जून रोजी रात्री जेवण झाल्यानंतर पीडितेच्या पतीने तिला त्याच्या मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. भाजीपाला विक्रीच्या व्यवसायात फायदा व्हावा, हा त्यामागचा पतीचा उद्देश होता. मात्र, पीडितेने असे कृत्य करण्यास नकार दिल्याने पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर रात्री तिचा पती बाहेर गेला. घरी परतल्यानंतर त्याने पीडितेला बळजबरीने शीतपेय पाजले. शीतपेय प्यायल्याने अर्धातासानंतर तिला चक्कर येऊ लागले. याचवेळी पतीने तिला मित्राच्या मदतीने बाथरुमध्ये नेले. त्याठिकाणी पतीने तिला पकडून ठेवल्यानंतर त्याच्या मित्राने पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर पतीनेही तिच्यावर अत्याचार केला. तसेच घडलेला हा प्रकार कुणाला सांगितला तर मुलांना व तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
तीन महिन्यांनी गुन्हा दाखल -
अत्याचाराची घटना घडल्यानंतर पतीने जुलै महिन्यात पीडितेला माहेरी पाठवून दिले. पीडितेने माहेरी येताच संपूर्ण घटना कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर याप्रकरणी काल (शुक्रवारी, 18 सप्टेंबर) रात्री उशिरा पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन तिचा पती आणि त्याचा मित्र यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पीडितेचा पती व त्याचा मित्र फरार आहेत.