जळगाव - राज्यभरात आज कोरोना लसीकरणाची ड्राय रन पार पडत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह चार ठिकाणी ड्राय रन आयोजित करण्यात आली होती. मात्र, जळगावात ड्राय रन नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरू झाली. ड्राय रनसाठी सकाळी 9 वाजेची वेळ निश्चित होती. परंतु, 9 वाजून 30 मिनिटांनी ड्राय रन सुरू झाली. ड्राय रनची तयारी सुरू असतानाच पालकमंत्री गुलाबराव पाटील रुग्णालयात दाखल झाल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभाराची प्रचिती आली.
जळगाव जिल्ह्यात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शहरातील शिवाजीनगरातील महापालिका आरोग्य केंद्र, जळगाव तालुक्यातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत एकाचवेळी कोरोना लसीकरणाची ड्राय रन पार पडली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नर्सिंग महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत ड्राय रनसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी प्रतीक्षालय, लसीकरण कक्ष आणि देखरेख कक्ष, अशा प्रकारची त्रिस्तरीय रचना केलेली होती. ड्राय रनसाठी 25 आरोग्य कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती.
अशी पार पडली प्रक्रिया-
लसीकरणासाठी निवड केलेल्या या सर्व कर्मचाऱ्यांना सुरुवातीला प्रतीक्षालयाबाहेर एका रांगेत फिजिकल डिस्टन्सिंगमध्ये उभे केले होते. आधी त्यांचे हात सॅनिटाईज करून स्क्रिनिंग केली गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एक-एक कर्मचारी लसीकरणासाठी आत गेला. प्रतीक्षालयात लसीकरणाला आलेल्या कर्मचाऱ्याची कागदपत्रे पडताळून ओळख स्पष्ट करण्यात आली. त्यानंतर लसीकरण कक्षात त्याची माहिती 'कोविन ऍप'मध्ये समाविष्ट करून कर्मचाऱ्याला लसीकरणासाठी नेण्यात आले. त्याठिकाणी नर्सने कर्मचाऱ्याला कोरोनाची लस देऊन यापुढे काय खबरदारी घ्यावी, लसीचा दुसरा डोस कधी दिला जाईल, याची माहिती दिली. लस घेतल्यानंतर पुढे त्या कर्मचाऱ्याला देखरेख कक्षात अर्धा तास बसवण्यात आले. लस घेतल्यावर त्याला काही त्रास होत आहे का? याची खात्री करून नंतर त्याला घरी सोडण्यात आले.
ड्राय रनमध्ये मिलिंद काळे यांना मिळाली पहिली लस-
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पार पडलेल्या ड्राय रनमध्ये जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी मिलिंद काळे यांना पहिली लस मिळाली. दरम्यान, कोरोना लसीकरणाची प्रक्रिया अत्यंत सोपी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मी स्वतः लसीकरणाचा अनुभव घेतला. कोरोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे आवाहन यावेळी मिलिंद काळे यांनी केले.
यांची होती उपस्थिती-
ड्राय रनची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे स्वतः दाखल झाले होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोळे आदींची उपस्थिती होती. लसीकरणाच्या प्रक्रियेबाबत डॉ. नागोराव चव्हाण व डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पालकमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. ड्रायरनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आरोग्य कर्मचारी मिलिंद काळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज- डॉ. नागोराव चव्हाण-
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मकर संक्रांतीनंतर लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणेने योग्य ती पूर्वतयारी, यंत्रसामुग्रीची जमवाजमव केली आहे. लसीच्या साठवणुकीसंदर्भात देखील तयारी सुरू आहे, अशी माहिती डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील दुर्गम भागात लसीकरणावेळी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण येऊ नये म्हणून अतिरिक्त डोंगल, ब्रॉडबँड कनेक्शन देखील उपलब्ध केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सूचना पाळाव्यात-
जळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोना लसीकरणासाठी सज्ज झाली आहे. या पुढच्या काळात लसीकरणाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. तेव्हा नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
हेही वाचा- शिवसेनेचा भाजपाला दे धक्का! दोन बडे नेते शिवबंधन बांधणार
हेही वाचा- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात होणार हजर