जळगाव - जिल्हा कारागृहातून रक्षकाला बंदूकीचा धाक दाखवून २५ जुलैला तीन कैदी फरार झाले होते. यातील मुख्य सूत्रधार असलेला बडतर्फ पोलीस कर्मचारी सुशील मगरे हा पुन्हा पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मगरेला पहूर पोलिसांनी शिताफीने पकडले. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यास अटक करण्यात आली.
दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या सुशील अशोक मगरे या बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने कारागृहातील अन्य कैदी गौरव पाटील आणि सागर पाटील यांच्यासह २५ जुलैला पलायन केले होते. कारागृहातील रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून ते आरोपी जगदीश पाटील याच्या मदतीने फरार झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महिन्याभरानंतर यातील दोन आरोपींना अटक केली, ते कारागृहात आहेत. मात्र मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलीस कर्मचारी सुशील अशोक मगरे (रा. पहूर, ता.जामनेर) पोलिसांना चकवा देत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विविध पथक त्याच्या मागावर होते. अखेर रविवारी त्याला अटक करण्यात आली.
पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सुशील मगरे याच्या लेलेनगर भागातील घरी पोलिसांनी पहाटे साडेपाचच्या सुमारास अचानक धाड टाकली. मात्र पोलीस आल्याची कुणकुण सुशील मगरेला लागली. तो घरातून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
आरोपी कैदी सुशील मगरे हा १२ सप्टेंबर २०१७ रोजी जळगाव तालुक्यातील म्हसावद पोलीस दुरक्षेत्रात ड्यूटीवर असताना, त्याने गुन्हेगारांची टोळी तयार करून नेरी- औरंगाबाद रस्त्यावरील माळपिंप्रीजवळ उभ्या ट्रकच्या चालकाला बंदुकीचा धाक दाखवून लूट केली होती. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर, सुशील मगरे याला अटक करण्यात आली होती.