जळगाव - मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचे दिग्दर्शन असलेला 'सिंहासन' हा चित्रपट राजकारणावर आधारित आहे. सध्या याच चित्रपटाप्रमाणे राज्याच्या राजकारणात महिनाभरापासून घडामोडी घडत आहेत, अशा तिरकस शब्दांत माजीमंत्री एकनाथ खडसेंनी राज्याच्या राजकीय वर्तुळातील परिस्थितीवर भाष्य केले. येथील लेवा एज्युकेशनल युनियनचा शताब्दी महोत्सव समारोप समारंभ गुरुवारी सायंकाळी पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. या समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ सिने दिग्दर्शक तथा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.
खडसे पुढे म्हणाले, डॉ. जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले 'सिंहासन', 'सामना' हे चित्रपट राजकारणावर आधारित आहेत. डॉ. पटेलांच्या चित्रपटांचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव राहिला आहे. विधानसभेत असताना अनेकदा मी तसे उल्लेख केलेले आहेत. एखाद्यावर अन्याय झाला असेल आणि विधानसभेत असताना मला त्याच्याविषयी गृहमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा असेल तर मी 'सामना' चित्रपटातील मारुती कांबळे नामक व्यक्तीची भूमिका असलेल्या पात्राप्रमाणे 'त्या मारुती कांबळेचे काय झाले', अशा शब्दांत प्रश्न विचारत असल्याची आठवण देखील खडसेंनी यावेळी सांगितली. भाजपवर नाराज असल्याने पक्षांतर करण्याच्या मानसिकतेत असलेले खडसे या कार्यक्रमात एखाद्या राजकीय मुद्द्यावर स्फोटक मत मांडतील, अशी अपेक्षा होती. मात्र, खडसेंनी यावेळी राजकीय भाष्य करण्याचे टाळले.
हेही वाचा - 'अजून खाती वाटून शकले नाही, हे सरकार जनतेला न्याय काय देणार ?'
डॉ. जब्बार पटेलांमुळे मराठी चित्रपट सृष्टीला प्रतिष्ठा -
डॉ. जब्बार पटेल यांनी नाट्य तसेच मराठी चित्रपट सृष्टीत भरीव काम केले आहे. त्यांच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीला प्रतिष्ठा मिळाली. पूर्वीच्या काळी दमदार मराठी चित्रपट येत होते. मात्र, मध्यंतरीच्या काळात चांगले मराठी चित्रपट येत नव्हते. त्यामुळे मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक वळत नव्हते. मात्र, डॉ. पटेलांनी हे चित्र बदलले, असेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.
हेही वाचा - 'आपण भाषणबाजीत पुढे, १३५ कोटी लोकसंख्येच्या देशात ऑलम्पिकमध्ये यश नाही'
प्रकट मुलाखतीतून उलगडला पटेलांचा जीवनप्रवास -
या समारंभात शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी डॉ. जब्बार पटेल यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत डॉ. पटेलांचा जीवनप्रवास उलगडला. ते नाट्य, चित्रपट सृष्टीत कसे आले, त्यांनी आजवर केलेली नाटके, चित्रपटांविषयी त्यांनी माहिती दिली. आजवरच्या प्रवासात भेटलेले विविध अभिनेते, त्यांच्या सोबतचे रंजक अनुभव देखील यावेळी त्यांनी सांगितले.