जळगाव - जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणांवर मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून कारवाई सुरु आहे. आज बुधवारी अजिंठा चौकातील दुसऱ्या बाजुच्या रस्त्याकडून कारवाईस सुरुवात करण्यात आली. माजी महापौर यांच्या भावाच्या मालकीच्या हॉटेलचे अतिक्रमण देखील यावेळी पाडण्यात आले. यानतंर महामार्गाजवळील गॅरेज चालकांचे अतिक्रमण काढतांना काहीवेळ तणाव निर्माण झाला.
मनपाच्या सूचनांकडे दुर्लक्ष
बुधवारी पलीकडच्या भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे अनेक विक्रेत्यांना मंगळवारीच मनपा अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढून घेण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही अनेक मुजोर विक्रेते व गॅरेज चालकांनी मनपाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत दुकाने थाटली होती. मनपाचे पथक पोहचल्यानंतर सर्व विक्रेते व गॅरेज चालक एकत्र जमा झाले. तसेच कारवाईला विरोध केला. अनेक बड्यांचा अतिक्रमणाकडे मनपा लक्ष देत नसल्याचा आरोप ही केला. मात्र, मनपा आयुक्तांनी सुरुवातीलाच माजी महापौरांच्या भावाच्या मालकीची असलेल्या हॉटेल प्रीतमच्या अतिक्रमणावरच जेसीबी चालविण्याचा सूचना दिल्या. महामार्गालगत हॉटेलचे कंपाऊंड आले होते. सर्व पक्के बांधकाम मनपाच्या पथकाकडून तोडण्यात आले.
गॅरेज चालकांचा कारवाईला विरोध
मनपाच्या पथकाकडून कारवाईला सुरुवात झाल्यानंतर अनेक टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आल्या. एका गॅरेज चालकाने कारवाईचा विरोध करत थेट जेसीबी समोर येवून उभा राहिला. मनपा कर्मचाऱ्यांनी संबधित व्यक्तीला बाहेर काढले. मात्र, तरीही थेट टपरीवर बसून कारवाईस विरोध केला. त्यानंतर पोलीसांनी या व्यक्तीला उचलल्यानंतर मनपाच्या पथकाने टपऱ्या तोडण्यास सुरुवात केली.काही गॅरेज चालक व काही भंगार व्यावसायीकांनी साहित्य दुकानाबाहेर काढण्यास नकार दिला. मात्र, मनपाकडून कारवाई सुरुच ठेवण्यात आल्याने विक्रेत्यांनी मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. यामुळे काही काळ याठिकाणचे वातावरण तणावपुर्ण झाले होते. मनपाच्या पथकाकडून दोन दिवसात महामार्गालगतच्या २५० अतिक्रमणांवर कारवाई केली असून, यामध्ये पक्क्या बांधकामाचाही समावेश आहे. तर १०० हून अधिक टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आल्या आहेत.