जळगाव - कुसुंबा येथील पाटील दाम्पत्याच्या खून प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहे. त्यात संशयाची सुई पाटील दाम्पत्याशी परिचित असलेल्या व्यक्तींकडे वळत आहे. आर्थिक व्यवहारातून हे हत्याकांड झाले असावे, असा प्राथमिक निष्कर्ष गेल्या दोन दिवसांच्या पोलीस तपासातून निघत आहे. त्या दृष्टीने संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, आर्थिक व्यवहारासह या हत्याकांडाला अनैतिक संबंध किंवा नातेसंबंधातील कटुता, अशा प्रकारच्या इतर काही बाबींची किनार आहे का, या बाजूही पोलीस पडताळून पाहत आहेत. म्हणूनच आतापर्यंत या प्रकरणात अटकसत्र सुरू झालेले नाही.
काय आहे नेमके प्रकरण -
कुसुंबा येथील मुरलीधर राजाराम पाटील (54) आणि आशाबाई मुरलीधर पाटील (47) या दाम्पत्याचा 21 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गळा आवळून खून केला होता. ही घटना 22 एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली होती. त्यांच्या घरातून काही दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे दिसून येत आहे. मात्र, नेमका किती ऐवज चोरीला गेला आहे, हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात खून तसेच जबरी लुटीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
आतापर्यंत 8 ते 10 नातेवाईक व परिचितांची चौकशी -
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 8 ते 10 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली आहे. घटनास्थळी असलेली परिस्थिती आणि परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेतले, तर हे हत्याकांड कुणीतरी परिचित व्यक्तींनीच केल्याचे स्पष्ट होत आहे. कारण, मारेकरी घरात अत्यंत सहज शिरल्याचे दिसून येत आहे. परिचित व्यक्तींनी दाम्पत्याचा खून करून चोरीसाठी हे हत्याकांड घडल्याचे भासवले आहे. म्हणूनच दागिने, रोकड चोरल्याचा बनाव केल्याची दाट शक्यता आहे.
आर्थिक व्यवहारातून झाला घात? -
पाटील दाम्पत्य लोकांना व्याजाने पैसे देत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. व्याजाच्या पैशांच्या व्यवहारातून वाद होऊन खून झाले असावे, अशी शक्यता आहे. दुसरीकडे, पाटील दाम्पत्याला फक्त दोन मुली होत्या. त्यांना मुलींव्यतिरिक्त इतर वारसदार नव्हते. अशा परिस्थितीत मालमत्तेच्या हव्यासापोटी तर हत्याकांड घडले नाही ना? या दृष्टीनेही पोलीस तपास सुरू आहे.
ब्रोकर, त्याचा मुलगाही संशयाच्या भोवऱ्यात -
या प्रकरणात पोलिसांनी मुरलीधर पाटील ज्या ब्रोकरकडे कामाला होते. त्याला आणि त्याच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हे दोघेही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. ब्रोकरचे पाटील कुटुंबीयांकडे नेहमी येणे-जाणे होते. त्यामुळे पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. पाटील दाम्पत्याचा दुसरा कोणताही व्यवसाय नव्हता. उत्पन्नाचा ठोस स्रोत नसताना त्यांच्याकडे असलेली मालमत्ता चक्रावून टाकणारी आहे. त्यामुळे पाटील दाम्पत्य हे ब्रोकरच्या माध्यमातून व्याजाच्या पैशांचा व्यवहार तर करत नव्हते ना, असा व्यवहार असेल तर व्यवहारात पैशांची अफरातफर होऊन वाद निर्माण झाला असावा, त्यातून हे हत्याकांड तर घडले नाही ना, ही बाजू पोलीस तपासून पाहत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - रुग्णालयाकडून कॅशलेस उपचार मिळत नसल्यास राज्य सरकारकडे तक्रार करा- आयआरडीएआय