जळगाव - अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे चार लाख हेक्टरवरील पिके वाया गेली असून, शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका कापूस पिकाला बसला आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने अक्षरशः मातीमोल झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनचे आगमन झाल्याने पेरण्या लवकर झाल्या. मात्र, त्यानंतर अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे जुलै ते ऑगस्टमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर पावसाने वार्षिक सरासरी भरून काढत चांगलाच दणका दिला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला असून, खरीप हंगाम पूर्णपणे पाण्यात गेला आहे.
५ लाख शेतकऱ्यांना बसला फटका
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरच्या अखेरीस जोरदार पाऊस झाला. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, अमळनेर तसेच जामनेर तालुक्यासह इतर ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. या नुकसानीची प्राथमिक माहिती कृषी विभागाने मिळवली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील १ हजार ४३७ गावांमध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. ४ लाख ८५ हजार शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण साडेसात लाख हेक्टरपैकी ३ लाख ७१ हजार २५५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्याची आकडेवारी कृषी विभागाने जाहीर केली आहे. नुकसानीचा आकडा हा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
अमळनेर तालुक्याला सर्वाधिक फटका
अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका हा अमळनेर तालुक्यातील शेतीला बसला आहे. अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ५२ हजार ३२५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर या तालुक्यांनादेखील मोठा फटका बसला आहे. कापूस, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन ही पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हाती एक रुपयांचेही उत्पन्न मिळणार नाही, अशी बिकट परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. कापूस, मका, ज्वारी, बाजरी या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याची माहिती कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. मात्र, यावर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ४१ हजार ६२९ हेक्टर क्षेत्रावरील कोरडवाहू कापसाचे ३३ टक्कयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. २ लाख ५५ हजार हेक्टरवरील बागायती कापसाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात साधारणपणे पाच ते साडेपाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. परिणामी पिकाचे नुकसान झाल्याने कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे.
हेही वाचा - त्रिशूळ पर्वतावर हिमस्खलन: नौदलाचे पाच जवान बेपत्ता, रेस्क्यू सुरू
कापूस वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बागायती कापसाचे उत्पादन निघायला सुरुवात होते. मात्र, यावर्षी नेमका याच काळात मुसळधार पाऊस झाल्याने बागायती कापूस शेतातच भिजला आहे. काही शेतांमध्ये कापसाची बोंडे सडली आहेत. त्यामुळे हा कापूस वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतातील ओला कापूस वेचून घरी आणून ठेवला आहे. हा कापूस उन्हात वाळवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. कापूस भिजल्याने त्याची प्रतवारी घसरली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळणार नसल्याची स्थिती आहे.
हेही वाचा - अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाचा समन्स; 16 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश