जळगाव - सद्यस्थितीत आपण आधुनिक काळात वाटचाल करत आहोत. काळ बदलला मात्र काही ठिकाणी आजही जात, पात, धर्मभेद पाळले जात असल्याची शोकांतिका आहे. ग्रामीण भागात आजही आंतरजातीय विवाहाला मान्यता नसल्याचे चित्र आहे. अशाप्रकारे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पारोळा (Parola) तालुक्यातील एका गावात आंतरजातीय विवाह (Inter Caste Marriage) केला म्हणून विवाह करणार्या मुलीसह तरुणावर गाव सोडण्याची वेळ आली आहे.
- काय आहे प्रकरण?
पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथे आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलगी तसेच मुलाच्या कुटुंबियांना मुलीच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांकडून मारहाण करत छळ केला जात असल्याचा प्रकार समोर आहे. दोघेही सज्ञान आहेत. १५ ऑगस्टला दोघांनी आंतरजातीय विवाह केल्यानंतर पारोळा पोलिसात हजर झाले. याठिकाणी पोलिसांनी मुलगा व मुलगी दोघांकडील आई वडीलांना बोलावले. मुलगी सज्ञान असल्याने तिने पतीसोबत राहण्याचे सांगितल्यावर कायदेशीररित्या नोंदही करण्यात आली. मात्र, आता मुलगी परत द्या म्हणत मुलीचे वडील तसेच नातेवाईक तरुणाला तसेच त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करत छळ करत आहेत असा आरोप तरुणाकडून केला जात आहे. याबाबत पारोळा पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप तरुणाने केला आहे. कारवाईच्या मागणीसाठी दाम्पत्याने पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली आहे.
आईवडीलांना घरात घुसून तसेच सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली जात आहे, शिवीगाळ केली जात आहे. मुलीला तसेच मलाही मारहाण करण्यात येत असून छळ केला जात आहे. गावात राहायचे नाही म्हणत गाव सोडले नाहीतर जीवे मारण्याची धमकीही मुलीच्या कुटुंबियांकडून दिली जात आहे. दोघांनी एकमेकांच्या संमतीने कायदेशीररित्या हा विवाह केला असून आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी दाम्पत्याने केली आहे.
- पोलिसात परस्परविरोधात तक्रारी -
याप्रकरणात पोलिसात परस्परविरोधात तक्रारी दाखल आहेत. त्यांची योग्य ती चौकशी करण्यात येवून कारवाई करण्यात येईल. मुलीच्या वडीलांना समज देण्यात येवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुलगा व मुलगी सज्ञान असल्याने कायदेशीररित्या त्यांना काहीही होवू नये म्हणून पोलीस त्यांच्या पाठीशी आहेत, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.