जळगाव - जळगावात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. सद्यस्थितीत जळगाव शहर हे कोरोनाचे जिल्ह्यातील प्रमुख हॉटस्पॉट आहे. शहरात 3 हजार 147 रुग्ण आहेत. त्यातील 2 हजार 245 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, 785 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, एकट्या जळगाव शहरात आतापर्यंत 117 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनाचे मृत्यू जळगावातच आहेत.
कोरोनाने आता महापौरांच्या घरातच शिरकाव केला आहे. महापौर भारती सोनवणे यांच्या मुलीसह, दीर व पुतण्याला कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांचे वैद्यकीय तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून महापौर आणि त्यांचे इतर कुटुंबीय क्वारंटाईन झाले आहेत. लवकरच त्यांचीही वैद्यकीय तपासणी होणार आहे.
दरम्यान, याआधी कोरोनाने जिल्हा परिषदेत शिरकाव केला होता. आता जिल्हा परिषदेपाठोपाठ महापालिकेतही कोरोना शिरला आहे. महापालिकेच्या सहाय्यक उपायुक्तासह आरोग्यधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिकेत विशेष खबरदारी घेतली जात आहे. महापालिकेत कामाशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रत्येकाचे स्क्रिनिंग केले जात आहे.