जळगाव - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे जगातील अनेक देशात लॉकडाऊन घोषित करावा लागला आहे. तर, देशातील काही राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून दुसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी 'अॅक्शन मोड'मध्ये काम करा, असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.
राधाकृष्ण गमे आज दुपारी जळगाव जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
गाफील राहून चालणार नाही
आयुक्त राधाकृष्ण गमे पुढे म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मृत्यूदरही नियंत्रणात येत आहे. परंतु, तो अजून कमी होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करताना गाफिल राहून चालणार नाही. जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने दक्षता बाळगावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात यावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेचा पूर्ण क्षमतेने वापर करून अधिकाधिक तपासण्या करण्यात याव्यात. तपासणी अहवाल प्रलंबित राहाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे गमे म्हणाले.
कोमॉर्बिड आणि हाय रिस्क रुग्णांवर लक्ष ठेवा
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेदरम्यान आढळून आलेल्या कोमॉर्बिड आणि हाय रिस्क रुग्णांच्या संपर्कात राहावे. त्यांना आवश्यकता भासल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करावे. कोमॉर्बिड रुग्णांना लक्षणे नसली तरी त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्यावर लक्ष ठेवावे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या चार राज्यांतून येणाऱ्या नागरिकांची तपासणी काटेकोरपणे करावी. नॉन कोविड रुग्णांना वेळेत उपचार मिळतील याचीही दक्षता घेण्याच्या सूचना राधाकृष्ण गमे यांनी यावेळी दिल्या.
बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, नोडल अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला सुरुवात; सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी अडचणीत