जळगाव - एकत्रित येवून आपसातील भांडणे सोडवा तसेच रडणे बंद करुन आता मैदानात उतरुन जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढवावा कधीही गरज लागल्यास आम्ही तुमच्या मदतीला येवू अशा शब्दात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाचे संघटना वाढविण्याचा सल्ला दिला. जिल्ह्यातील नेत्यांनी त्यांना संपर्क मंत्री होण्याची केलेली मागणी फेटाळून लावत त्यांनी तुम्हीच सक्षम व्हा असे आवाहनही केले. जळगावातील काँग्रेस भवन येथे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आज शुक्रवारी (दि.२७) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. दुपारी चार वाजता जळगावातील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात काँग्रेस भवनमध्ये त्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी खासदार डा. उल्हास पाटील, आमदार शिरिष चौधरी, डी. जी. पाटील, जिल्हा प्रभारी प्रकाश मुग्दीया यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
अधिकारी ऐकत नसतील तर योग्य पध्दतीने समजवा -यावेळी मार्गदर्शन करतांना मंत्री ठाकूर यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात आल्यावर बरे वाटते. जिल्ह्यातील नेत्यांनी मला जळगाव जिल्ह्याची संपर्कमंत्री होण्याचा आग्रह देखील केला आहे. मात्र, तुम्ही इतके सक्षम व्हायला पाहिजे की, तुम्हाला बाहेरुन कुणाचीही गरज पडायला नको, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे नेत्यांनी केलेली मागणी फेटाळून लावली. तुम्ही ठरवलं ते तुम्ही करु शकता. हा जिल्हा तुमचा आहे. स्वत:ला कमी लेखू नका. जिल्ह्यातील तरुणांना आता व्यासपीठावर स्थान दिले पाहिजे त्यांना सामोरे केलं पाहिजे त्याशिवाय पक्ष मोठा होणार नाही, असेही त्या म्हणाल्यात. आपला पराभव झाला यासाठी दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपला दोष आहे, हे मान्य करायला पाहिजे. सर्वच जर सोनियाजी व राहुल गांधी करतील तर तुम्ही काय करणार ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तुम्ही तुमची ताकद दाखविली तर आम्ही तुमच्या मदतीला येवू. अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना योग्य पध्दतीने समजवा. संघटना जिवंत राहिली तरच आपण जिवंत राहू, हे कायम लक्षात ठेवा, असेही त्यांनी सांगितले.
महिला अत्याचार रोखण्यासाठी लवकरच कायदा -जिल्ह्यासह राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी शासनस्तरावर मंथन सुरू असून शक्ति कायदा प्रस्तावित असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महिला अत्याचार रोखण्यासाठी शक्ति कायदा प्रस्तावित असून त्यासाठी प्राथमिक बैठकही राज्यस्तरावर झाली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत त्यावर चर्चा करून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच महिलांचे सेफ्टी ऑडीट करण्याचेही काम सुरू आहे. वीज प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, मागच्या काळात मोठी थकबाकी राहिली होती. असे असले तरी महाविकास आघाडी सरकार ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
मुख्यमंत्री अतिशय मोठ्या मनाचे -
केंद्र सरकारकडुन राज्याचा हक्काचा पैसा येत नाही. कोविड सारखे संकट असताना भाजपाकडून राजकारण केलं जात असून संविधान जाळणारे लोक आज वीज प्रश्नावर आंदोलन करीत असल्याचा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला. राज्याचे मुख्यमंत्री अतिशय मोठ्या मनाचे आहेत. कोविडची परिस्थिती त्यांनी उत्तमपणे हाताळली आहे. निधी वाटपाच्या संदर्भात त्यांनी सांगितले की, तीन पक्षाचे सरकार आहे, त्यामुळे थोडीफार हमरीतुमरी ही चालूच राहते. सरकार पडणार या देवेंद्र फडणवीसांच्या दाव्याची ॲड.यशोमती ठाकुर यांनी खिल्ली उडविली.