जळगाव - मागील आठवड्यात जळगावातील बाजार समित्यांचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सध्या अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी तयार आहे. परंतु बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांना एकतर त्यांचे पिक कमी भावामध्ये विकावे लागत आहे. अथवा घरी घेऊन जावे लागत आहे. शेतकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी वरील बाजार समित्यांमध्ये फक्त धान्य खरेदीचे व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये धान्याचे व्यवहार लॉकडाऊनच्या काळात सुरू ठेवण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज काढले आहेत.
हेही वाचा... बँकेतील गर्दी टाळण्यासाठी 'बदनापूर पॅटर्न', बँक प्रतिनिधींद्वारे महिला व वृद्धांना घरपोच सेवा
धान्य बाजारांचे व्यवहार सुरू ठेवताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचना, आदेश, निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. नागरिकांची कोणत्याही प्रकारे गर्दी होऊ न देता सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) पाळावे. त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांवर देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास शिक्षा करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भाजीपाला मार्केटमधील व्यवहार बंद
हे आदेश देत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र, जळगाव, अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील भाजीपाला मार्केटचे व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.