जळगाव - शाळेला उन्हाळी सुट्ट्या असल्याने अनेक मुले सुट्ट्य़ांचा आनंद घेत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याच्या कळंबे गावातील लहान मुलांनी मात्र वेगळी वाट शोधली आहे. पाणी व अन्नाअभावी होणारी पक्ष्यांची होरपळ थांबविण्यासाठी शाळकरी मुलांनी पुढाकार घेतला आहे. मुलांनी टाकाऊ बाटल्या व डब्यांचा वापर करून धान्य-पाणी झाडावर ठेवले आहे.
सुमारे ४५ ते ४६ अंश सेल्सिअस तापमान असल्यामुळे अन्न व पाण्यासाठी पक्ष्यांचे हाल होत आहेत. हे पाहून लहान मुलांनी एकत्र येत झाडांवर पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय केली आहे. यातून त्यांनी संवेदनशीलता आणि भूतदयेची प्रचिती दाखवून दिली आहे.
अमळनेर तालुक्यात गेल्या दोन तीन वर्षांपासून दुष्काळाचे सावट असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पक्षी व जनावरांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दुष्काळात पक्ष्यांना अन्न व पाणी मिळावे, यासाठी कळंबे गावाच्या मुलांनी अभिनव उपक्रम राबविला. मुलांनी पाण्याच्या रिकाम्या बॉटल व प्लास्टिकचे छोटे डबे व्यवस्थित कापले. त्याच्यामध्ये पाणी तसेच बाजरी, गहू असे धान्य ठेवले आहे. हे कापलेले डबे आणि प्लास्टिक बाटल्या जंगलातील प्रत्येक झाडांना बांधून ठेवले आहे. अशा प्रकारे उपक्रम राबवून प्राणी मात्रांवर दया करावी, हा संदेश मुलांनी दिला आहे.
ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात उन्हाचा फटका बसत आहे. अशा वातावरणात मुलांनी झाडांवर चढून पक्ष्यांच्या अन्न व पाण्याची सोय केल्याने त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.