जळगाव - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरीत मास्टरमाइंड असलेल्या एका 'बंटी-बबली'च्या जोडीला बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांकडून 25 चोरीच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून, तपासात अजून काही चोरीच्या दुचाकी मिळण्याची शक्यता आहे. 'बंटी और बबली'च्या जोडीने गेल्या 4 वर्षांत अनेक दुचाकी चोरुन त्यांची कवडीमोल भावात विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. हेमलता देवीदास पाटील (वय 35, रा. खड्डाजीन, अमळनेर) व निवृत्ती सुकलाल माळी ऊर्फ छोटू (वय 48, रा. माळीवाडा, अमळनेर) अशी अटक केलेल्या दोन्ही चोरट्यांची नावे आहेत.
हेमलता पाटील व निवृत्ती माळी यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी गाजलेला हिंदी सिनेमा 'बंटी और बबली'प्रमाणे चोरी हाच आपला उदरनिर्वाहाचा धंदा म्हणून अवलंबलेला होता. 4 वर्षे दुचाकी चोरी केल्यानंतर अखेर ते पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. हेमलता पाटील ही घटस्फोटित आहे. काही वर्षांपूर्वी तिची आणि निवृत्ती माळी याची न्यायालयात भेट झाली होती. तेव्हा निवृत्ती हा एका स्टॅम्प वेंडरकडे मदतनीस म्हणून काम करत होता. या ओळखीनंतर दोघांमध्ये प्रेम झाले. मग त्यांनी दुचाकी चोरीचा धंदा सुरू केला. शासकीय कार्यालये, विविध शहरातील मार्केटमधून ते दुचाकी लांबवायचे. त्यानंतर स्टॅम्प पेपरवर लेखी करुन चोरीची दुचाकी 10 ते 12 हजारात विक्री करायचे.
दोघांचा सुगावा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना लागला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या पथकातील संजय सपकाळे, अशरफ शेख, सुधाकर अंभोरे अशांनी दोघांवर पाळत ठेवून चोरीची दुचाकी विकताना बंटी-बबलीच्या जोडीला रंगेहाथ अटक केली. पथकातील नरेंद्र वारुळे, विजय पाटील, किरण चौधरी अशांनी एका मागून एक अशा 25 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
अशी होती दोघांची चोरीची पद्धत-
चोरी करताना धाडस हवे, म्हणून दोघेही चोरी करण्यापूर्वी दारू प्यायचे. त्यानंतर हेमलता वाहनाजवळ जाऊन बनावट चावीने ते चोरायची. यावेळी निवृत्ती माळी लांब उभा राहून पाळत ठेवत असे. दुचाकी लांबवली की, सुसाट वेगात दोघेही पळ काढायचे. ही त्यांची गुन्हा करण्याची पद्धत होती. दोघांनी गुन्हा कबूल केलं आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी जप्त केल्या जात आहेत. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी घेणारे देखील य गुन्ह्यात सहआरोपी होतील, अशी माहिती पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी दिली.