जळगाव - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या दीड वर्षात बैठका घेण्याशिवाय दुसरे कुठलेही ठोस काम केलेले नाही. असे असताना त्यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर केलेले आरोप म्हणजे 'नाचता येईना अंगण वाकडे' असाच प्रकार असल्याचा पलटवार भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान, निधीच्या मुद्द्यावरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये चांगलाच सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
भाजपच्या काळातील निधीवरील स्थगिती उठवून दाखवा -
काल (रविवारी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केले होते. महाजन यांच्या काळात जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे लक्ष्यवेधी काम झाले नाही. गिरीश महाजन यांनी शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणण्याच्या वल्गना करत जळगावची वाट लावल्याचा आरोप केला होता. त्यावरून आज भाजप पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. गुलाबराव पाटील यांनी महापालिकेला भाजपच्या काळात मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीवरील स्थगिती उठवून दाखवावी, असे थेट आव्हानच भाजपने दिले.
पालकमंत्र्यांनी बैठका घेण्याशिवाय दुसरे काय केले? -
यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महापालिकेत व राज्यात भाजपची सत्ता असताना तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेवरील सुमारे ४५० कोटींच्या कर्जाचा प्रश्न मार्गी लावून महापालिका कर्जमुक्त केली. तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडून २५ कोटी त्यानंतर महापालिकेत भाजपची सत्ता येताच १०० कोटी रुपयांचा निधी आणला. त्यातील ४१ कोटींच्या कामांच्या निविदाही निघाल्या. मात्र, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच या निधीला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे जळगाव शहराचा विकास खुंटल्याचा आरोपदेखील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. कोरोना काळात काम करण्याची संधी असताना गुलाबराव पाटील यांनी केवळ बैठका घेण्याशिवाय दुसरे काय केले, असा प्रश्नदेखील भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
सरकार तुमचे, १०० कोटी आणून दाखवा -
जळगाव शहराच्या विकासासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्याच सरकारने ४१ कोटींच्या कामांना जी स्थगिती दिली आहे, ती सात दिवसांत उठवून दाखवावी. तसेच ५८ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी आणावी, असे आव्हान भाजप पदाधिकाऱ्यांनी दिले. त्याचप्रमाणे, सरकार तुमचे आहे, तर सरकारकडून आणखी १०० कोटींचा निधी आणून दाखवावा, असेही आव्हान दिले.
हेही वाचा - नागपूरच्या 'पेपर बोर्ड कंपनी'ला भीषण आग, नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू