जळगाव - अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती केंद्र सरकार बंद करण्याच्या विचारात असल्याचा गैरसमज काँग्रेसकडून पसरवला जात आहे. केंद्र सरकारने अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षण शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये ५९ हजार कोटी रुपयांची भरीव वाढ केली असल्याची माहिती भाजपाचे आमदार संजय सावकारे यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत दिली.
निधीत कपात होणार असल्याची होती चर्चा
गेल्या काही दिवसांपासून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती केंद्र सरकारकडून बंद करण्यात येणार आहे, किंवा शिष्यवृत्तीसाठी असलेल्या निधीत कपात केली जात असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत मोदी सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी जळगावात भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, दीपक साखरे, महेश जोशी उपस्थित होते.
पूर्वी बोगस विद्यार्थी दाखवून लाटला जात होता निधी
आमदार संजय सावकारे यांनी पुढे सांगितले, की आत्तापर्यंत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या 'पीएमएस-एससी' या योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ही पुरेशी नव्हती. तसेच या शिष्यवृत्तीच्या वितरणातही भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या. केंद्रीय मंत्रिमंडळाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती निधीमध्ये गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सर्वोच्च वाढ केली आहे. शिष्यवृत्तीचे वाटप पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता, आधार ओळखपत्र, जातीचे प्रमाणपत्र व बँक खात्याचा तपशील पडताळून ऑनलाइन (डीबीटी) पद्धतीने निधीचे वितरण करण्यात येणार आहे. सन २०१७ ते २०२० या कालावधीत अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी ११०० कोटी रुपये निधी दिला जात होता. आता आगामी पाच वर्षात दरवर्षी हा निधी ६ हजार कोटी करण्यात आला आहे. या निधीतील केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के असून राज्य सरकारला ४० टक्के खर्च करावा लागणार असल्याचेही सावकारे यांनी सांगितले. पूर्वी बोगस विद्यार्थी दाखवून निधी लाटण्यात येत असल्याने त्यात आता पारदर्शकता आणल्याचेही शेवटी आमदार सावकारे म्हणाले.
'प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न'
आमदार सावकारे यांनी यावेळी आपल्या पक्षांतरच्या चर्चेचे खंडन केले. माझ्या वाढदिवसाचा फलक लावताना संबंधिताने कुणाचा फोटो लावावा? हे मी सांगू शकत नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे या विषयावरुन गैरसमज करणे चुकीचे आहे. मी भाजपात निवडून आलो आहे आणि भाजपातच राहणार असल्याची स्पष्टोक्ती आमदार सावकारे यांनी दिली. माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंनी राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधल्यानंतर त्यांचे समर्थक असलेल्या भाजपातील पदाधिकारीदेखील त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. भुसावळचे आमदार सावकारे खडसेंचे निकटवर्तीय असल्याने त्यांचे नाव देखील या चर्चेत आघाडीवर होते. तसेच सावकारे यांच्या वाढदिवसाला झळकलेल्या फलकावर भाजपाचे चिन्ह न टाकत एकनाथ खडसे यांचा फोटो असल्याने सावकारांच्या भूमिकेबाबत उत्सुकता होती. आज आमदार सावकारे भाजप कार्यालयात आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली. आपण भाजपातच राहणार असल्याचे स्पष्ट करीत माझे सर्वपक्षातील लोकांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या फलकावरून कुठलाही चुकीचा अर्थ काढू नये, असेही त्यांनी सांगितले.