जळगाव - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर आरोप केल्याच्या निषेधार्थ जळगावात भाजपच्या (BJP) वतीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. जळगाव शहरातील टॉवर चौकात बुधवारी (दि. 10) सायंकाळी साडेचार वाजता भाजपच्या वतीने निदर्शने करत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मलिक यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची केली मागणी -
आर्यन खान (aryan khan) ड्रग्स प्रकरणात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे दररोज विविध आरोप करत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचा दावा करत भाजपच्या वतीने नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. बळीराम पेठेतील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. टॉवर चौकात नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. दरम्यान, यावेळी भाजपच्या आंदोलक कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मलिक यांनी राजीनामा दिला नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
समीर वानखेडेंना भाजपचा पाठींबा -
यावेळी भाजपच्या आंदोलनाची भूमिका मांडताना महानगरप्रमुख दीपक सूर्यवंशी म्हणाले की, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे तथ्यहीन आरोप करत आहेत. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे योग्य पद्धतीने तपास करत होते. त्यात आपल्या मर्जीतील लोकांचा भांडाफोड होणार असल्यानेच नवाब मलिक हे वानखेडे यांना टार्गेट करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ते सूडबुद्धीने आरोप करत आहेत. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. मलिक यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी दीपक सूर्यवंशी यांनी केली.
हे ही वाचा - जिल्हा बँक निवडणूक : सर्वपक्षीय असंतुष्ठांनी मोट बांधत रिंगणात उतरवले शेतकरी विकास पॅनल!