जळगाव - चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रविदास महाराज यांचे दिल्लीतील तुघलकाबाद येथील मंदिर प्रशासनाने अकारण पाडले. त्यामुळे देशभरातील चर्मकार समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. जळगावात चर्मकार महासंघाने निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, तर चाळीसगावात चर्मकार उठाव संघाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदवला. धरणगाव, पाचोरा, एरंडोल शहरात देखील या घटनेच्या निषेधार्थ आंदोलने झाली.
दिल्लीतील तुघलकाबाद येथील संत रविदास महाराजांचे मंदिर प्रशासनाने अकारण पाडले आहे. दिल्ली सम्राट सिकंदर लोधी यांनी संत रविदास महाराज यांना गुरू मानून गुरुदक्षिणा स्वरूपात 12 एकर जमीन दान म्हणून दिली होती. याच जागेवर रविदास महाराजांचे मंदिर उभारण्यात आले होते. या मंदिराचा जीर्णोद्धार तत्कालीन पंतप्रधान बाबू जगजीवन राम यांनी केला होता. सातबारा उताऱ्यावर मंदिराची नोंद असताना हे मंदिर दिल्ली व केंद्र सरकारच्या वतीने संगनमताने पाडण्यात आले आहे, असा आरोप करत चर्मकार समाज बांधवांनी निषेध आंदोलने केली.
या घटनेमुळे देशभरातील चर्मकार समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे सरकारने संत रविदास महाराज यांच्या मंदिराची जागा परत देऊन त्याठिकाणी संत रविदास महाराजांचे मंदिर उभारावे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. चर्मकार समाजाच्या मागणीची दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे.