जळगाव - खराब रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात चाक गेल्याने कैद्यांना घेऊन जाणारी पोलीस व्हॅनला अपघात. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील भोद-चावलखेडा दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात ६ पोलीस कर्मचारी व ७ कैदी जखमी झाले.
वाहनचालक पवन कृष्णा पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर बागुल, निंबा भदाणे, पंकज वराडे, संतोष जाधव व किरण पाटील अशी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर युनूस खान उस्मान खान, किशोर गोपीचंद पाटील, समाधान विलास पाटील, महेंद्र राजेंद्र कोळी (सोनवणे), सागर राजेंद्र कोळी, राजेंद्र खंडू सोनवणे व चंद्रकांत सुभाष सपकाळे अशी जखमी कैद्यांची नावे आहेत. विविध गुन्ह्यांमध्ये जिल्हा उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या या कैद्यांच्या खटल्यावर शनिवारी अमळनेर येथील न्यायालयात सुनावणी होती. त्या निमित्ताने मुख्यालयातील पोलिसांचे पथक या कैद्यांना व्हॅनमधून अमळनेर येथे घेऊन जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, भादे-चावलखेडा फाट्याजवळ खराब रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात व्हॅनचे पुढचे चाक गेले. यामुळे व्हॅन रस्त्याच्या डाव्या बाजुला कलंडली.
अपघाताच्या वेळी व्हॅनच्या मागून येणाऱ्या एसटी बसमधील प्रवाशांनी अपघाताची माहिती पिंप्री येथील रुग्णवाहिका चालक बंडु पाटील यांना दिली. यानंतर काही मिनिटातच बंडु पाटील हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व जखमींना एकाच वेळी जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. यातील व्हॅनचालक पवन पाटील यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर कैदी समाधान पाटील याच्या छातीला मुक्कामार बसला आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.