जळगाव- लॉकडाऊनच्या काळात विशेष परवाना असलेल्या वाहनधारकांनाच पेट्रोल दिले जात आहे. अशात ओळखीचा फायदा घेत विनापरवाना पेट्रोल भरणाऱ्या एका दुचाकीस्वारासह पेट्रोल पंपमालक व पेट्रोल भरून देणारी महिला कर्मचारी अशा तिघांवर जळगावातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हापेठ पोलीस निरीक्षक अकबर पटेल, अविनाश देवरे, भटू नेरकर, छगन तायडे यांचे पथक आकाशवाणी चौकात बंदोबस्ताला होते. यावेळी आनंदा गाविंदा पाटील (वय.४०, रा. गणेशनगर) हा दुचाकी क्र. (एम.एच-१९, ए.एक्स-२९६५) ने जात होता. पोलिसांच्या पथकाने त्याला थांबवून चौकशी केली असता आनंदा पाटील याने पेट्रोल भरण्यासाठी बाहेर आलो, असे उत्तर दिले. त्यावर पोलिसांनी पेट्रोल भरण्याचा परवाना आहे का? अशी विचारणा केली असता काबरा पेट्रोल पंपावर ओळख असल्यामुळे विनापरवाना पेट्रोल मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले.
या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आनंदा पाटीलसह काबरा पेट्रोल पंपाचे मालक मनोज प्रेमराज काबरा व पेट्रोल पंपावरील कर्मचारी साधना सुनील लांडगे या तिघांविरुद्ध कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात प्रथमच अशी कारवाई करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करणे अपेक्षित आहे. परंतु, नागरिक अजूनही बेजबाबदारपणे वागत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.
हेही वाचा- लॉकडाऊनचा परिणाम, जळगावात रस्ते अपघातात प्रचंड घट