हिंगोली - वंशाचा दिवा हा मुलगाच, ही मानसिकता २१ व्या शतकात देखील कायम आहे. याबाबत पुरुषांसह महिलांची देखील मानसिकता अजून मागासलेलीच असल्याची एक घटना समोर आली आहे. पाठोपाठ सहा मुली झाल्याने मुलगा व्हावा याच अशेपोटी सातव्यांदा गर्भवती राहिलेल्या महिलेचा प्रसूतीसाठी रुग्णालयात नेताना मधेच मृत्यू झाला आहे. बेबी सतीश पाईकराव (३५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
वंशाचा दिवा हा मुलगाच या प्रकारची मागासलेली मानसिकता २१ व्या शतकातही तग धरून असल्याचे पाहायला मिळते. मुलगा हवाच या हट्टापायी ७व्यांदा गर्भवती असलेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला. बेबी हिला पाठोपाठ ६ मुली झाल्या, सतीश पाईकरावं हे सालगडी म्हणून काम करतात. त्यांनी अनेकदा पत्नीची समजूत घालण्याचा प्रयत्न केल्याचे सदर महिलेच्या भावाने सांगितले. मात्र, वंशाला दिवा असावा म्हणून बेबी हट्ट धरून बसली होती. यामुळे, ती मानसिक तनावाखाली होती. अखेर प्रसूतीसाठी कळमनुरी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तपासणी करून तिला पुढील उपचारासाठी जिल्हासमान्य रुग्णालयात रेफर केले. मात्र, मात्र रुग्णालयात पोहचण्याआधी वाटेतच या महिलेचा मृत्यू झाला.
हेही वाचा - भाजप सरकार अन् ईडीच्या निषेधार्थ सेनगाव बंद
वास्तविक पाहता शासनस्तरावर मुलगा मुलगी समान असल्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, या घटनेवरून शासनाच्या जनजागृती मोहिमेचा परिणाम मुलगाच वंशांचा दिवा असावा अशी मानसिकता असलेल्या कुटुंबावर कितपत होतो हेच या घटनेतुन समोर येते. तर, मृत महिलेचे नातेवाईक जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात आक्रोश करीत आहेत.
हेही वाचा - हिंगोली: कत्तलखाना उभारणीचे काम बंद करण्यासाठी महिलांचा नगरपालिकेवर मोर्चा