हिंगोली - जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या खुलेआम कत्तलींचे प्रमाण वाढले आहे. मात्र, वनविभाग गाड झोपेत असल्याने याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्राण्यांची संख्या कमी होत आहे. वन विभागाच्या बेजबाबदारपणाचा फायदा घेत जिल्ह्यात प्रत्येक दिवशी किती वन्यप्राण्यांच्या शिकारी होत असाव्यात याचादेखील अंदाज सांगता येणार नाही.
जिल्ह्यात विविध प्रजातीचे पाच ते दहा हजारच्यावर वन्य प्राणी जंगलामध्ये दाखल असल्याच्या नोंदी वनविभागाकडे आहेत. कधी पाण्याअभावी तर कधी अपघातात वन्य प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे. मागील काही दिवसांपासून तर चक्क वन्यप्राण्यांच्या कत्तलीचा सपाटाच सुरू आहे. तरीदेखील वन विभाग केवळ बघ्याची भूमिका निभावत आहे. यामुळे या वन्यप्राण्यांच्या कतलीचे प्रमाण वाढल्याचे भयंकर चित्र दिसून येत आहे.
रविवारी सेनगाव तालुक्यातील दूरचुना परिसरात एका वन्यप्राण्याची उघड्यावर शिकार करून त्याचे तुकडे करून विक्री केले जात असल्याचे स्पष्ट दिसून आले. यासोबतच इतर तालुक्यांमध्येही सर्रासपणे वन्यप्राण्यांच्या शिकारी केल्या जात आहेत. यामध्ये रोही, हरणे, रानडुक्कर, मोर आदी प्राण्यांच्या शिकारी करत खुले आम विक्री सुरू असल्याचे वास्तव या घटनेवरून समोर आले आहे.
वनविभागाचे कर्मचारी नेहमीच वनविभागात फेर फेरफटका मारत असल्याचे दाखवतात. मात्र, जंगली परिसरात खुलेआम वन्य प्राण्यांची शिकार करून त्याचे तुकडे केले जात असतील तर या कर्मचाऱ्यांचा फेरफटका नेमका कुठे राहतो ? हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.
वनविभागाचे वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होते. मात्र, आता वनविभाग वन्यप्राण्यांच्या होत असलेल्या शिकारीकडेही दुर्लक्ष करत आहे, ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. मग वनविभाग नेमके कोणाचे संरक्षण करत आहे ? असा सवाल येथील जनता उपस्थित करत आहे.