हिंगोली- आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीतील एका वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. नारायण जाधव असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. ते सेनगाव तालुक्यातील कडती येथील रहिवासी आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ते पायी दिंडीसोबत देवदर्शनाला निघाले होते. मात्र, यावेळेस त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि उपचारादरम्या त्यांचा मृत्यू झाला.
नारायण जाधव हे पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या दिंडीमध्ये एका आठवड्यापूर्वीच दाखल झाले होते. जाधव हे तब्बल पंधरा वर्षापासून या दिंडीमध्ये सहभागी होत होते. दिंडी सातारा जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर जाधव यांना अचानक चक्कर आली आणि काही समजण्याच्या आतच ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब नजीकच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच जाधव यांची प्राणज्योत मालवली.
जाधव हे अल्पभूधारक असून ते देवाचा धावा करत दरवर्षी न चुकता आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीमध्ये सहभागी व्हायचे. यावर्षीही जाधव यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पायी दिंडीसोबत रवाना होताना मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला होता. मात्र, अचानक ही भयंकर घटना घडल्याने कडती या गावा बरोबरच संपूर्ण जिल्ह्यावरच शोककळा पसरली आहे.