हिंगोली - येथील मशिदीत ईदनिमित्त नमाज अदा करून येणाऱ्या एका युवकाला दुसऱ्या युवकाने मारहाण केल्याची घटना घडली. यावरून एवढे वादंग पेटले की, लाठीचार्ज सुरू झाला आहे. यावेळी पोलिसांच्या दिशेने दगडफेकही करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर दिसेल त्यावर पोलीस लाठीचार्ज करत आहेत.
दरम्यान, एका युवकाने दुसऱया युवकाला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच काही नागरिकांनी मध्यस्थी करत त्या युवकाची समजूत घालून हा वाद मिटवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, अचानक गोंधळ वाढल्याने घटनास्थळी पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने दाखल झाले. तसेच लाठीचार्ज करण्याचेही आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, स्वतःहून योगेश कुमारदेखील लाठी घेऊन घटनास्थळी आहेत. हा वाद एवढा चिघळला आहे की, रस्त्यावर जो कोणी दिसेल त्यावर लाठीचार्ज केला जात आहे.
लाठीचार्ज सुरू असल्याने हिंगोली शहरात वातावरण तणावग्रस्त झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तर, नांदेड नाका परिसरात काही वाहनांवरही दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांचेही बरेच नुकसान झाले आहे.