हिंगोली- व्यापाऱ्याने कनेरगाव नाका येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कवडीमोल दराने सोयीबन घेतल्याची शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दाखल खेली आहे. मात्र, आठवडा उलटूनही कारवाई झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. भारत पठाडे (रा. कनेरगाव नाका) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
भारत पठाडे यांनी कनेरगाव नाका येथील उप कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 19 ऑक्टोबर रोजी कनक ट्रेडिंग कंपनीत सोयाबीनची विक्री केली होती. त्यांना प्रथम 2, 800 रुपये असा भाव सांगून व्यापाऱ्यांनी 1, 800 रुपयाने सोयाबीनची खरेदी केली. पठाडे यांचे शिक्षण कमी आहे. त्यामुळे त्यांनी ट्रेडिंगने दिलेली पावती घरी जाऊन मुलाला दाखविली. त्यांना 1, 800 रुपये भाव मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तेव्हा पठाडे हे धावत उपबाजार समितीमध्ये आले. त्यांनी सोयाबीनचा हा दर परवडत नसल्याचे व्यापाऱ्यांना सांगितले. सोयाबीन परत करा, अशी त्यांनी व्यापाऱ्याकडे मागणी केली. त्यावर व्यापाऱ्यांनी एकदा घेतलेले सोयाबीन हे परत देता येत नसल्याचे सांगत भारत पठाडे यांना धमकी दिली.
पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ-
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पठाडे यांनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे शेतकऱ्याच्या तक्रारीची पोलिसांनी दप्तरी नोंद करून घेतलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. या संपूर्ण प्रकाराने पठाडे हे भयभीत झाले आहेत. तर या प्रकरणात गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. बाजार उप बाजार समितीला नोटीस देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.