हिंगोली- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाबाधित जवानांचा 14 व 15 दिवसानंतर थ्रोट स्वॅबचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. या दोन जवानांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सकारात्मक बातमीने हिंगोलीकरांना दिलासा मिळाला आहे.
हिंगोली येथील राज्य राखीव बल गट क्रमांक 12 मधील दोन तुकड्या मालेगाव अन मुंबई येथे बंदोबस्त आटपून हिंगोली येथे आल्या होत्या. ते हिंगोलीत येण्याआधीच प्रशासनाच्यावतीने त्यांच्या अलगीकरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच आरोग्य प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 84 जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवालातुन स्पष्ट झाले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात 91 रुग्णावर उपचार सुरू होते. यातील दोन जवानांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या कोरोना वार्डमध्ये 88 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून हिंगोली येथील पाच जवान औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे हिंगोली येथे कोरोना संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
जिल्ह्यात तालुका स्तरावर करण्यात आलेल्या शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये 1353 संशयित दाखल झाले आहेत. यापैकी 1229 संशयिताचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये 1081 जणांना प्रशासनाच्यावतीने घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोनाला हरविलेल्या जवानांना डिस्चार्ज दिला आहे. तर उर्वरित जवानदेखील लवकरच बरे होतील, यासाठी देखील सर्वजण प्रयत्न करीत असल्याचे शल्यचिकित्सक किशोर श्रीवास यांनी सांगितले.