हिंगोली - दिवाळीनिमित्त लहानांसह मोठेही फटाके उडवतात. अशातच दिवाळी तोंडावर येऊन ठेपली असून एका चिमुरड्याच्या आनंद जिवावर बेतला आहे. फटाके फोडत असताना फटाका थेट त्याच्या डोळ्यात शिरला, आणि डोळा निकामी झाला. ही घटना औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे घडली आहे. साईनाथ घुगे रा. गोजेगाव ता. औंढा नागनाथ असे या चिमुरड्याचे नाव आहे.
नेमकं काय घडलं? -
दिवाळी सण हा अवघ्या तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त फटाके मोठ्या प्रमाणात दुकानावर दाखल झालेले आहेत. दिवाळी म्हटले की आनंदाला काही परिसीमाच नसते. यावेळी फटाके फोडून आनंद द्विगुणित केला जातो. अशाच प्रकारे साईनाथने मोठ्या आनंदात फटाके फोडले. मात्र, फटाके फोडत असताना एक फटाका थेट त्याच्या डोळ्यावर गेला. यामध्ये साईनाथ हा गंभीर जखमी झाला. त्याला प्राथमिक उपचारासाठी आवडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. मात्र, तेथेही उपचार न झाल्याने सध्या हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयांमध्ये साईनाथवर उपचार सुरू आहेत. मात्र, या आनंदाच्या उत्साहमध्ये साईनाथला आपला डोळा गमवावा लागला आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.
सावधानी बाळगणे गरजेचे -
दीपावली सण म्हटला की गोड पदार्थ आणि यात सर्वांत महत्त्वाचे असते फटाके. फटाके फोडून हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यामध्ये सर्व जण सहभागी होऊन फटाके फोडतात. मात्र, फटाके फोडताना थोडा जरी निष्काळजीपणा झाला तर फटाका हा आपल्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात साक्षी नोंदवण्याच्या प्रक्रियेला सुरूवात