हिंगोली - संपूर्ण जगात खळबळ उडवलेल्या कोरोनामुळे सर्वांचे आर्थिक चक्र हे पूर्णपणे बदलले आहे. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वांनाच बसला आहे. या संकटातून शिक्षक देखील सुटलेला नाही. अनेकांची भविष्य घडवण्यासाठी हातात खडू घेऊन अक्षरं गिरवणाऱ्या हिंगोलीतील एका शिक्षकाला आपल्या कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी भाजीपाला विक्री करावी लागत आहे.
रामेश्वर दशरथ मोरे असे या शिक्षकाचे नाव आहे. मोरे यांचे बीए ,डीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. अनेक शिक्षण संस्थाचालकांचे उंबरठे झिजवले मात्र, पैसे भरल्याशिवाय संस्थेवर नोकरी मिळत नाही. त्यामुळे मोरे यांनी नोकरीचा नाद सोडून शिकवणी वर्ग सुरू केले. आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या चार बॅचेस त्यांच्याकडे होत्या. मोरे यांची गणितावर चांगली पकड असल्याने, त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही खूप होती. एका बॅचमध्ये जवळपास 30 ते 40 विद्यार्थी असल्याने, यातून त्यांना महिन्याकाठी चांगले उत्पन्न मिळत होते.
मध्यंतरी मोरे यांचे वडील आजारी पडले. त्यांनी शिकवणीतून येणारा सर्व पैसा उपचारांसाठी खर्च केला. मात्र, त्यांचे वडील वाचू शकले नाहीत. शिकवण्या सुरुळीत सुरू असल्याने उपचारांसाठी झालेला खर्च भरून निघेल असा मोरे यांना विश्वास होता. मात्र, अचानक कोरोनाने देशात पाऊल ठेवले आणि सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला.
कोरोनामुळे तीन महिने लागलेल्या लॉकडाऊनमध्ये शिकवणी वर्ग बंद पडले. त्यामुळे मोरे यांच्या उत्पन्नाचा मार्गही बंद झाला. राहते घरही भाड्याचे असल्याने त्याचे तीन महिन्याचे भाडे थकले. कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठीही मोरे यांच्याकडे पैसा राहिला नाही. संकटांनी घेरलेले असतानाही मोरे यांनी हार न मानता मित्रांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीतून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
सध्या भाजीपाला विक्रीतून मिळत असलेल्या रकमेतून मोरे मित्रांकडून घेतलेली उसनवारी देण्याचा प्रयत्न करत आहेत. उरलेले पैसे ते आपले घर चालवण्यासाठी वापरत आहेत. मोरे यांच्या विद्यार्थ्यांचे पालक जेव्हा भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतात. तेव्हा प्रत्येकाला मोरेंकडे पाहून वाईट वाटत आहे. मोरे यांच्यासारख्या कित्येक उच्चशिक्षित नागरिकांवर कोरोनामुळे आर्थिक संकट कोसळले आहे.
या संकट काळात जीवन जगण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरीने धडपडत आहे. याचाच एक भाग म्हणून मोरे यांनी देखील संसाराचा गाडा हाकण्यासाठी भाजीपाला विक्री करण्याचा निर्णय घेतला. माझ्यासारखे अनेक शिक्षक सध्या व्यवसायांकडे वळले आहेत. कोणी भाजीपाल विकत आहे तर कोणी म्हैसपालन करत आहे. परिस्थीतीसमोर हार न मानण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देतो. तिच शिकवण आता मी प्रत्यक्षात जगत आहे, असे मोरे यांनी सांगतिले.