हिंगोली - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली त्यामुळे बळीराजाची या पावसाने चिंताच दूर झाली. हिंगोली जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या सुरूच आहेत. मात्र,रविवारी झालेल्या जोरदार पावसाने पेरणी करण्यात खंड पडण्याची शक्यता आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने शेतकरी आनंदी झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात या वर्षी देखील मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. मात्र, उशिरा का होईना पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यात केवळ दोन वेळाच धो धो पाऊस झालाय तर तीन ते चार वेळा रिमझिम पावसाने हजेरी लावली. दोन दिवसापासून पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे धूळ वाफेवर पेरणी केलेली पिकेही आता उगवत असल्याचे शेत शिवारात दिसत आहे. शेतकऱ्यांना अजून जोरदार पावसाची अपेक्षा आहे.
आत्तापर्यंत झालेल्या पावसाने जलसाठ्यावर काहीही परिणाम झालेला नाही. अजूनही वन विभागातील जलसाठे पूर्णता कोरडेच असल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबलेली नाही. मात्र हलक्याशा पावसाने का होईना पिकांची उगवण झाल्याने, शेतशिवार हिरवेगार दिसून येत आहे.