हिंगोली - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सोबतच नदी-नालेही दुथडी भरून वाहत आहेत. शेतकऱ्यांना आता खरीपाच्या पेरण्या करण्याचे वेध लागले आहेत मात्र, त्यासाठी शेत वाफश्यावर येण्याची प्रतिक्षा करावी लागेल.
जिल्ह्यात दोन दिवसापासून अधून-मधून पाऊस हजेरी लावत आहे. शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांची जोरदार पावसाची प्रतीक्षा संपली आहे. कृषी केंद्रावरदेखील खते, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. आज खंडाळा, जयपूर, मळहिवरा, बसांबा, पारोळा या भागात जोरदार पाऊस झाला. काल (बुधवारी) जिल्ह्यात 239 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे.