हिंगोली - कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे शेतात राहण्यासाठी गेलेल्या, शेतकऱ्याच्या शेतातील निवाऱ्यात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. शेतकऱ्यांची पत्नी गॅसवर चहा करत होती. तेव्हा सिलिंडरने अचानक पेट घेतला. हे पाहून तिने घराबाहेर धाव घेतली. त्यानंतर काही क्षणातच सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात निवाऱ्याशेजारी लावलेल्या चार दुचाकी आणि संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सेनगाव तालुक्यातील दाताडा (खु) येथील रहिवाशी गणेश काळे हे कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे कुटुंबीयासह शेतात वास्तवाला होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास गणेश यांच्या पत्नी चहा करत होत्या. तेव्हा गॅसने अचानक पेट घेतला आणि महिलेने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा करत घराबाहेर धाव घेतली. त्यानंतर काही क्षणातच सिलिंडरचा स्फोट झाला.
या आगीत निवाऱ्या शेजारी लावलेल्या चार दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या. दरम्यान, या आगीत जवळपास ५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शासनाने या घटनेचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काळे कुटुंबीयांनी केली आहे.
हेही वाचा - हिंगोलीत दारू दुकानांबाहेर 'बॅरिकेड्स'... खरेदीसाठी तळीरामांच्या लांबलचक रांगा
हेही वाचा - हिंगोलीत दारूच्या दुकानासमोर मद्यप्रेमींची गर्दी, गोंधळ झाल्याने दुकाने बंद करण्याची वेळ