हिंगोली - हैदराबाद येथून नांदेडकडे गहू घेऊन जाणारा ट्रक खड्ड्यात आदळल्याने अचानक पेटला. कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे ही घटना घडली. ग्रामस्थांनी जारचे पाणी वापरून आग आटोक्यात आणली. त्यांच्या सतर्कतेमुळे लाखो रुपयांचा गहू जळण्यापासून वाचला आहे.
कळमनुरी ते आखाडा-बाळापूर दरम्यान, नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच अपघाताच्या घटना घडतात. अपघातग्रस्त ट्रक गहू घेऊन नांदेड मार्गे निघाला असता बुधवारी पहाटे भवानी मंदिरासमोर ट्रकने पेट घेतला.
या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, जमादार गौसोद्दीन शेख, लिंबाजी कदम, संतोष कदम, पिंटू कदम, पंडित पतंगे, राजू खरोडे यांनी चालकाला ट्रकमधून बाहेर काढले. जवळच उपलब्ध असलेल्या जारच्या पाण्याने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र, ट्रकचे अतोनात नुकसान झाले.