हिंगोली - तालुक्यातील भांडेगाव येथे शेती वाटणीच्या वादावरून वडिलांनीच आपल्या मुलासह पत्नीला कुर्हाड अन् विळ्याच्या साहाय्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून आपल्या मुलासह पळ काढला. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा सर्व थरारक प्रकार ६ वर्षाच्या मुलीने बघितला आहे.
रामप्रसाद उर्फ बंडू महादेव गिरी आणि विजयमाला महादेव गिरी अशी जखमींची नावे आहेत. महादेव यांना २ पत्नी असून, त्यांना ३ अपत्ये आहेत. महादेव हे आपल्या दुसऱ्या पत्नीसमवेत म्हाळसगाव येथे वास्तव्यास राहतात. तर दुसरी पत्नी विजयमाला या आपला मुलगा रामप्रसाद यांच्या समवेत भांडेगाव येथे राहतात. त्यांच्याकडे एकूण १२ एकर शेती असून, महादेव ज्या पत्नी सोबत राहतात त्या पत्नीची मुले ती संपूर्ण शेती आमची असल्याचा दावा करत आहेत. हा वाद मागील तीन ते चार वर्षापासून सुरू आहे. तर, भांडेगाव येथे वास्तव्यास असलेल्या रामप्रसादने जी माझ्या शेती वाट्याला येईल ती घेण्यास तयार दर्शवली.
रामप्रसादने अनेकदा आपल्या वडिलांकडे तसे सांगितले होते. मात्र, आज वडील आणि दोन सावत्र भाऊ अचानक शेतामध्ये आले आणि त्यांनी रामप्रसाद आणि विजयमाला यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला एवढा गंभीर होता की, टोकदार विळाच चक्क रामप्रसादच्या पोटामध्ये भोसकला असून विजयमाला यांच्या पायावरही कुर्हाडीचे जबर वार केले. या घटनेत दोघे मायलेक गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. मात्र, निर्दयी पित्याने मागे वळून न पाहता आपल्या दोन मुलांसह घटनास्थळावरून दुचाकीने पलायन केले.
जखमींनी आरडाओरड केल्याने परिसरात शेत काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. जखमींना उपचारासाठी हलविले. सध्या जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात रामप्रसाद यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रेफर केले जाणार असल्याचे डॉक्टराने सांगितले. हा प्रकार रामप्रसाद यांच्या चैतन्या नावाच्या मुलीने डोळ्यासमोर पाहिल्यामुळे ती ओक्साबोक्सी रडत सदरील घटना सांगत होती. या प्रकरणी अजून तरी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.