हिंगोली - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी त्यांनी केवळ २ लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. ही कसली कर्जमाफी ही तर या सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टाच सुरू असल्याचा आरोप जिल्ह्यातील समगा येथील नारायण भालेराव आणि संजय भोसले या शेतकऱ्यांनी केला आहे. कोऱ्या सातबारावरून २ लाखांवर हे सरकार येऊन ठेपल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शेतकरी हा निसर्गासमोर हतबल झाला आहे. यात शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर निश्चितच आपल्याला दिलासा मिळेल अशी अनेक शेतकऱ्यांनी आशा बाळगली होती. मात्र, याही सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची कर्जमाफी होणार आहे. यासाठी कोणतीही अट लागू करण्यात आली नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. मात्र, या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांचे काहीही होणार नाही.
हेही वाचा - जवानाच्या पत्नीला व्हॉट्सअॅपवरून अश्लील संदेश पाठवने दुसऱ्या जवानाच्या अंगलट
सत्तेत येणारे प्रत्येक सरकार या कर्जमाफीचे नाव बदलतंय, आता या सरकारने महात्मा ज्योतिबा फुले या नावाने कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. हा सर्व पोरखेळ सुरू आहे. मागच्या सरकारने अनेक अटी व शर्यती लावून दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले. मात्र, अर्ज भरण्यासाठी बँकेत व संकेतस्थळावर जाण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला होता आणि आताही तीच परिस्थिती निर्माण होणार आहे. मग सत्तेत येणारे प्रत्येक सरकार हे शेतकऱ्यांशी कसे खेळतय हे आता करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या घोषणेने समोर आले आहे. खरोखरच सात बारा कोरा न झाल्यानेही आम्ही कर्जमाफी अजिबात मानणार नसल्याचे शेतकरी नारायण भालेराव अन् संजय भोसले यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - हिंगोलीमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, 157 जणांवर गुन्हे दाखल तर वसमतमध्ये शनिवारी बंदची हाक