हिंगोली - शहरापासून जवळच असलेल्या कोथळज येथील एका शेतकऱ्याने सततच्या नपिकीला कंटाळून कयाधू नदी परिसरात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. भिमराव शिवाजी सोळंके (वय २५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. पूर्वी शेतात क्विंटलने होणारा माल आता किलोवर येऊन ठेपलाय. भीमराव यांना एकूण दीड एकर शेती आहे. मात्र, निसर्गाच्या अवकृपेने शेतातील उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. यालाच कंटाळून कोथळज येथून वाहणाऱ्या कयाधू नदी परिसरात भीमराव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याला कळविली, मात्र उशिरापर्यंत कुणीही पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. रात्रीपासून अद्यापपर्यंत भिमराव यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेतच होता.
कोथळज येथील पोलीस पाटील यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन सदरील घटनेची माहिती दिली. तर घटनास्थळी पोलीस धाव घेत असल्याचे पोलीस पाटील यांनी सांगितले.