हिंगोली - कामगारांची नोंदणी करून त्यांना सुरक्षा किटचे वितरण केले जात आहे. नोंदणीमध्ये जवळपास 25 हजारापेक्षा जास्त कामगारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणी झालेल्या कामगारांना 3 महिन्यांपासून सुरक्षा किटचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, यामध्ये कामगार नसणाऱ्या लोकांना किटचे वाटप होत आहे. तसेच किट देण्यासाठी कामगारांकडून पैशांचीही मागणी होत आहे. त्यामुळे खरे कामगार सुरक्षा किटपासून वंचित आहेत.
हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणि न्यायालयाच्या इमारत बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा किट मिळल्याची चौकशी केली असता, खऱ्या कामगारांना सुरक्षा किट मिळाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लिंबाळा मक्ता भागात एका खासगी जागेत किट वाटपाचे काम सुरू आहे. येथे कामगार नसलेले लोकच खोटे दाखले देऊन किट मिळवत आहेत. तर कामगारांकडे पैश्यांची मागणी केल्यामुळे कामगारांनी किट घेणे अवघड झाले आहे.
त्यामुळे जे कधी मजूर नव्हते ते या सुरक्षा किटमुळे स्वतःला मजूर म्हणवून घेत आहेत. तर खरे मजूर, कामगार सुरक्षा किट विनाच काम करत आहेत. आतापर्यंत 25 हजारच्यावर मजुरांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले आहे. आणखी किट वाटपाचे काम सुरू आहे. मात्र, यामध्ये लवकरच प्रशासनाने लक्ष घातले तर खऱ्या कामगारांना किट मिळेल. त्यामुळे प्रशासनाने या सर्व प्रकारावर लक्ष देऊन खऱ्या कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.