हिंगोली - जिल्ह्यातील वाढती बाधितांची संख्या लक्षात घेता लोक घराबाहेर पडण्याचे देखील टाळत आहेत. मात्र, डॉक्टर्स रुग्णांची सेवा करण्यात कर्तव्यावर आहेत. वसमत येथील उपजिल्हा रुग्णलयात कोरोनाबाधित गरोदर महिलेची शस्त्रक्रिया सुखरूपणे पार पडली आहे. माता आणि बाळ दोघेही सुखरुप असल्याने मातेसह नातेवाइकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
वसमत तालुक्यातील पारडी खु. येथील 23 वर्षीय गरोदर महिलेला प्रसूती कळा जाणवत असल्याने नातेवाइकांनी उपजिल्हा रुग्णलयात दाखल केले. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आहे. त्याचप्रमाणे, प्रसूतीसाठी दाखल झालेल्या या गरोदर महिलेचीही प्रसूती पूर्व कोरोना चाचणी करण्यात आली. संबंधित महिला पॉझिटिव्ह असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे पझिटिव्ह महिलेची प्रसुती कुठे करावी, अशा प्रश्न डॉक्टरांसमोर होता.
डॉक्टरांनी ही बाब उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी तथा वसमत कोरोना सेंटरचे प्रमुख असलेले डॉ. सनाउल्ला खान यांच्यासमोर मांडली. त्यानुसार त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक किशोर श्रीवास यांना माहिती दिली. त्यांनी रुग्णालयातील प्रसूती कक्षात प्रसूती करण्याची परवानगी दिली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालयातील बंद पडलेल्या शस्त्रक्रिया विभागात या महिलेची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. माता व बाळ दोघांची प्रकृती स्थिर असून यशस्वीरित्या प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी वैद्यकीय अधीक्षक व त्यांच्या डॉक्टर टीमचे अभिनंदन केले. मातेसह तिच्या नातेवाईकांनी तर डॉक्टरांचे आभार मानले आहेत.