हिंगोली - वसमत तालुक्यातील बाभूळगाव येथे एका दिव्यांग शेतकरी महिलेने आपल्या स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सततची नापीकी, मुलीचे शिक्षण आणि भविष्यात तिच्या लग्नासाठी लागणाऱ्या खर्चाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे. ही घटना मंगळवारी पहाटे 5 च्या सुमारास उघडकीस आली.
द्रौपदाबाई गोपीनाथ मगर (29) अस मयत महिलेचे नाव आहे. द्रौपदाबाई ह्या एका पायाने अपंग असून, त्यांच्याकडे केवळ साडेतीन एकर कोरडवाहू शेती आहे. निसर्गाच्या आवकृपेमुळे शेतीमधून काहीच उत्पन्न निघत नाही. त्यामुळे घर खर्चात आर्थीक मदत करण्यासाठी मुलगा सचीन हा गावामध्ये मजूर काम करायचा. मुलगी विद्याने दहावीत 90 टक्के गुण मिळविले. तसेच बारावीत विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाली असून सध्या ती वैद्यकिय परीक्षेची तयारी करत होती.
सततची नापीकी, घरखर्च आणि मुलीच्या शिक्षणाच्या खर्चामुळे घरात काहीच पैसै उरत नव्हते. मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी अजून पैसे कुठून आणावा, शिवाय तीच्या लग्नासाठीही भविष्यात मोठा खर्च येणार, ही चिंता द्रोपदाबाई यांना लागली होती. अखेर कमी उत्पन अन वाढता खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने, हताश झालेल्या द्रोपदाबाई यांनी स्वतःच्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुलींच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने ग्रामीण भागातील पालक वर्ग हा धास्तावलेला आहे. कदाचित सरकारी योजनांची माहिती ग्रामीण भागातील पालकांना मिळत नसल्याचे विदारक चित्र या घटनेतून उघड झाले आहे.