हिंगोली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विनाकारण बाहेर न पडण्याच्या सूचाना प्रशासन वारंवार देत आहे. मात्र, नागरिकांवर याचा काहीही परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मॉर्निंग वॉकला आलेल्या 23 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या सर्वांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
![मॉर्निंग वॉकला आलेल्यांना पोलिसांनी असे बसवून ठेवले होते](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-hin-01-moring-wak-vis-7203736_24042020094559_2404f_1587701759_458.jpg)
हिंगोली जिल्ह्यात सहा कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जास्त खबरदारी घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. मात्र, नागरिकांकडून त्यांचे अजिबात पालन होत नसल्याचे दिसून आले. उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने आणि मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी शहरातील मॉर्निंग वॉक परिसराची पाहणी केली.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक मॉर्निंग वॉकसाठी फिरत असल्याचे दिसून आले. त्यांना तत्काळ पोलिसांनी ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणले. सर्वांना नोटीस बजावल्या असून, दुसऱ्यांदा हेच नागरिक मॉर्निंग वॉक करताना आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची तंबी पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.