हिंगोली - शहरात कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या कोरोनाबाधित जवानांची प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्या १९४ जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील मुख्य रस्ते वगळता इतर लहान रस्ते सील करण्यात आले आहेत.
देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. यामध्ये डॉक्टर, परिचारिका आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. शहरातील राज्य राखीव बल गट क्रमांक 12 मधील सी आणि डी ह्या तुकड्या मुंबई आणि मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेल्या होत्या. हिंगोली येथे या तुकड्या दाखल होताच समादेश मंचक ईप्पर आणि खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच जवानांना कॅम्पमध्येच अलगिकरण कक्षात ठेवले. एकाही अधिकारी तसेच जवानाला कोणाच्याही संपर्कात येऊ दिले नव्हते. सामान्य रुग्णालयाच्यावतीने जवानांचे घेतलेले नमुने हे औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाले असता, यात सहा जवानांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरात असलेला एकमेव कोरोनाग्रस्त रुग्ण बरा झाल्याने त्याला सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. आता आणखी सहा जवानांना लागण झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा कामाला लागली आहे. या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १९४ जवानांच्या चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झाले नाही. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.