पणजी - गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री आवश्यक असताना नियुक्त केले नाहीत. तर आता गरज नसताना आणि निवडणूक आचारसंहिता सुरू असताना २ आमदारांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावर निवडणूक आयोगाने कारवाई करत सदर पदे रद्द करावीत, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
पणजीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सरचिटणीस मिलिंद गावस यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, जेव्हा राज्याला मुख्यमंत्री नसल्याने उपमुख्यमंत्री आवश्यक होते. तेव्हा नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे आज पूर्णवेळ मुख्यमंत्री असताना या पदाची गरज नाही. केवळ महाराष्ट्र गोमंतक आणि गोवा फॉरवर्ड पक्ष कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी केलेल्या या नियुक्तीलर निवडणूक आयोगाने कारवाई करत ती पदे रद्द करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
गोव्यातील पोटनिवडणुकिच्या अनुषंगाने अन्य कोणत्याही पक्षाशी चर्चा झाली आहे का? यावर बोलताना गावस म्हणाले, अद्याप कोणीही आमच्याशी चर्चा केलेली नाही. तसेच पोटनिवडणूक लढवावी की नाही यावर पक्षात सध्या चर्चा सुरु आहे. गोवा सुरक्षा मंचशी आमची युती कायम आहे. शिवाय लोकसभा निवडणूक लढविली जाणार आहे. त्यामुळे पक्ष चिन्ह लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.