गोंदिया - वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना वार्डात डॉक्टर उपलब्ध राहत नसल्याने तसेच हव्या त्या प्रमाणात परिचारिका नसल्याने याचा ताण स्टाफ परिचारिकांवर येत आहे. यामुळे आज (मंगळवारी) वैद्यकीय महाविद्याल्यातील परिचारिकांनी वैद्यकीय महाविद्याल्याच्या अधिष्ठाते यांच्या दारासमोर काम बंद आंदोलनाला सुरुवात केली. तर या आंदोलनामुळे कोरोना वार्डात उपचार घेत असलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत.
कोरोना वार्डात डॉक्टरांच्या ड्यूटी लावूनही डॉक्टर उपलब्ध राहत नाहीत. त्यामुळे रुग्णांना आणि स्टाफ परिचारिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. तर नॉन कोरोना वार्डातही हीच परिस्थिती आहे. रुग्णांचे नातेवाईक परिचारिकांच्या अंगावर धावून येतात. तरी कधी अंगावर थुकतात. मात्र, तरीदेखील जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याकडे लक्ष देत नाहीत. एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होता आहे. दररोज 100 च्या वर कोरोना रुग्ण आढळत आहेत. ही जिल्ह्यात चिंतेची बाब आहे. तसेच कोरोना वॉर्डात 25 रुग्णाच्या मागे एका परिचारिका काम करत असल्याने मोठ्या प्रमाणात कामाचा ताण येत आहे. अशा परिस्थितीत काम तरी कसे करायचे. हा प्रश्न त्यांना सतावत आहे.
संपूर्ण रुग्णालयात 100 च्या वर परिचारिकांची गरज असताना फक्त 48 परिचारिका कसे काम करणार? असा प्रश्न येथील परिचारिकांनी केला आहे. त्यात 48 पैकी 9 परिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना 3 दिवस रुणालयात उपचार देऊन घरी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सेवा देऊनही आम्हाला उपचारासाठी रुग्णालयात उपचाराकरिता जागा नाही, अशी खंत या स्टाफ परिचारिकांनी व्यक्त केली आहे. या सर्व परिस्थितीवर तोडगा निघावा म्हणून या परिचारिकांनी काम बंद आंदोलन केले. दरम्यान, गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी रुग्णालयात येऊन आंदोलकांची भेट घेतली. वरिष्ठ अधिकऱ्यांशी बोलून दोन दिवसात तोडगा काढून देतो, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मात्र, तरीदेखील जोपर्यंत स्टाफ परिचारिका वाढवत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलक परिचारिकांनी घेतला आहे.
दुसरीकडे जेव्हा पासून गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आले आहे तेव्हापासून जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात यातील जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिष्ठाता या दोघांमध्ये समन्वय नाही. यामुळे अशी परिस्थिती प्रत्येकवेळी निर्माण होते. यामध्ये रुग्णांचे चांगले हाल होतात. मात्र, कोरोना काळातही वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात समन्वय होणार नाही तर रुग्णांना कसे उपचार मिळणार? असा प्रश्न येथील सर्वसामान्यांना पडला आहे.