गोंदिया: ही वाघाची कातडी कुठून आणली यावर सविस्तर तपास केला असता, पकडण्यात आलेल्या आरोपींकडून ही कातडी महाराष्ट्र राज्याच्या गोंदिया जिल्ह्यातून बॉर्डरवरून आणल्याची आरोपींनी कबुली दिली. विजापूर पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला असता गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील मुख्य आरोपी आणि आमगाव तालुक्यातील कातडी विकण्यास मदत करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेने जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली असून घटनेची माहिती जिल्ह्यातील वन विभागाला नसल्याची माहिती देखील समोर आली आहे.
वाघाची कातडी सीआरपीएफच्या अधिकाऱ्यास विकली : गोंदिया जिल्ह्यात बहुतांश भाग हा जंगलांनी व्यापलेला आहे. मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे अनेक जनावरे, वन्यप्राणी हे नवेगाव नागझिरा वाघ्र प्रकल्पामध्ये राहतात. गोंदिया जिल्ह्यातील जंगलाबरोबर मध्य प्रदेश जंगलामध्ये यांचा वावर मोठ्या प्रमाणात होत असतो. यामुळे प्राण्यांची शिकार करत त्यांची तस्करी करणारी टोळी ही गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. अशाच एका टोळीने सालेकसा जंगलातून एका वाघाची शिकार केली. यानंतर त्याची कातडी, नखे, हाडे आणि मिशीचे केस हे छत्तीसगड राज्यातील बीजापूर येथील 'सीआरपीएफ'चे सब इन्स्पेक्टर अमित झा आणि त्यांच्या 20 सहकाऱ्यांना कातडी विकली. याबाबत विजापूर वन विभागाने कारवाई करत अमित झा यांच्यासह वीस जणांना या गुन्हामध्ये आरोपी करून त्यांना अटक केली आहे.
वाघाला मारण्यासाठी वापरली युक्ती : याविषयी त्यांनी सविस्तर तपास केला असता सालेकसा तालुक्यातील शेरपार जंगलातून या वाघाची शिकार करून ही कातडी विकली असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुख्य आरोपी शालिक मरकाम (वय 55 वर्षे, रा. कोसाटोला), सुरज मरकाम (वय 45 वर्षे कोसाटोला) आणि जियाराम मरकाम (रा. नवाटोला सालेकसा) असे या तिघांनी मिळून वाघाला करंट लावून मारले असल्याचे कबूल केले आहे. तसेच घटनास्थळावरून वाघाच्या हाडांचे तुकडे मिळाले असल्याचे छत्तीसगड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच वाघाची नखे आणि मिशीचे केस विक्री करणार असल्याचे आरोपींनी कबूल केले आहे.
मदत करणाऱ्यांमध्ये यांचा समावेश : या तिघांना वाघाची कातडी विकण्यासाठी मदत करणाऱ्या आरोपींमध्ये गेदलाल भोयर, तुकाराम बघेले, अंगराज कटरे, वामन फुंडे, या चार आरोपींचा समावेश असून त्यांना सालेकसा तालुक्यात अटक करण्यात आली. तसेच या विक्री कामांमध्ये मदत करणारे आमगाव येथील शामराव शिवनकर (53 वर्षे), रेल्वेमध्ये नोकरी करणारे जितेंद्र पंडित, यादवराव पंधरे, अशोक खोटेले अशा 11 लोकांना वन विभाग बीजापूर येथील वन अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या सर्वांना विजापूर छत्तीसगड येथे नेण्यात आले आहे.
हेही वाचा: