गोंदिया - कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी १ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिन अत्यंत साधेपणाने करण्यात येणार आहे. केवळ जिल्हा मुख्यालय म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे. येत्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत आहे. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
हेही वाचा... एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये : मुख्यमंत्री
राज्य शासनाकडून यावर्षी महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच ध्वजारोहण करण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात १ मे रोजी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण होईल.
गोंदिया जिल्ह्यात अन्य कोणत्याही ठिकाणी असा ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात येऊ नये. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजीत ध्वजारोहण कार्यक्रमाला देखील जास्त संख्येने अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उपस्थित राहू नये, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.