गोंदिया - जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव येथील चान्नाबाकटी ते येरंडीदेवी मार्गावरील शेतात शनिवारी दुपारच्या सुमारास बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. त्याच्या पोटाचा भाग फाटलेला असल्याने त्याला कोणी मारले तर नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.
चान्नाबाकटी ते येरंडीदेवी मार्गावर फागो कापगते यांचे शेत आहे. त्याठिकाणी बिबट्या मृत अवस्थेत दिसल्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ नवेगाव-बांध वनविभागाला कळविले. त्यानंतर वनविभागाने आपल्या चमूसह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृत बिबट्याचे वय दीड वर्षाचे असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच त्याचा मृत्यू देखील ३ दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता आहे.
पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरच बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर भिवखिडकी येथील रोपवाटिकेत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर बिबट्याचे अवयव प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला? हे शवविच्छेदन झाल्यावरच स्पष्ट होणार आहे. या घटनेचा पुढील तपास नवेगाव बांध वनविभाग करत आहे.
अर्जुनी-मोरगाव नैसर्गिक संपदेने नटलेला तालुका आहे. या तालुक्यातील नवेगाव-बांध राष्ट्रीय उद्यान व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. वनक्षेत्र लाभलेला तालुका असल्याने येथे वन्यप्राण्यांच्या अनेक प्रजाती प्रकर्षाने दिसून येतात. त्यातच तालुक्यातील अनेक गाव जंगल परिसराला लागून आहेत. त्यामुळे वन्यप्राणी अनेकदा गावात येत असतात. तसेच मागील २ दिवसांपासून या परिसरात बिबट्या दिसून येत असल्याचे ही बोलले जात आहे.