गोंदिया - शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. मागील ११ महिन्यात जिल्ह्यातील १ हजार ११९ नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. पायी किंवा गाडीने जात असलेल्या नागरिकांचा ही मोकाट कुत्री पाठलाग करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागरिक मोकाट कुत्र्यांच्या दहशतीत -
गोंदिया शहरात फिरताना ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांचे कळप नजरेस पडतात. या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येणाऱया-जाणाऱया नागरिकांवर ही कुत्री धावून जातात. गेल्या ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये हजारपेक्षा जास्त नागरिकांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मोकाट कुत्र्यापासून बचाव करताना अनेक अपघातसुद्धा घडले आहे. मुलांना शाळेत जाताना, महिलांना बाजारला जाताना या कुत्र्यांच्या दहशतीखालीच जावे लागते. अंगणात खेळणाऱया लहान मुलांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
गोंदिया शहरात मोकाट कुत्र्यांचा हौदोस सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतर नगर परिषद प्रशासनाला जाग येणार आहे का? अशा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणार -
नगर परिषद प्रशासनाने दोन वर्षपूर्वी कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले होते. तरीही शहरात कुत्रांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाला मिळत आहेत. त्यामुळे आता पुन्हा कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणार असल्याचे नगर परिषद प्रशासने सांगितले आहे.