गोंदिया - जिल्ह्यातील तिरोडा येथील अदानी समुहाच्या अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड या विद्युत प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रोष प्रकल्पाविरोधात वाढतच आहे. याचाच परिणाम स्वरूप रविवारी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब आंदोलन केले.
कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या निकाली निघाव्यात, कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्यात याव्यात, या मागणीला घेवून संघर्ष मजूर संघटना नावाची संघटना निर्माण केली आहे. कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी, या संघटनेद्वारे प्रकल्प प्रशासनाकडे केली आहे. यानंतर मात्र कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता १६ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे, असे मजूरांचे म्हणणे आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून कर्मचारी घरी बसून आहेत.
हेही वाचा... 'नोकऱ्या भरपूर, योग्य उमेदवार नाहीत', भाजप मंत्र्याच्या वक्तव्यावर मायावती, प्रियांकांची टीका
या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि आपल्या न्याय मागण्यांसाठी मजूर संघटने मार्फत अदानी विद्युत प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नोकरीतून काढण्यात आलेले कर्मचारी आपली पत्नी, मुलांसमवेत आंदोलनात सहभागी झाले होते.
हेही वाचा... सौदी अरेबियातील अरामको तेल कंपनीवर ड्रोन हल्ला; तेल उत्पादन थांबवले
विद्युत प्रकल्प प्रशासन दडपशाही करत असून गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे. याविरोधात हा लढा सुरूच राहणार असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करू, प्रसंगी आत्महत्या देखील करणार असल्याचे आंदोलक संघटनेचे अध्यक्ष दिलीप मलेवार यांनी म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना १ ऑगस्ट पासून कायम करून मूळ वेतन देण्यात यावे, संघटन मान्य करण्यात यावे, अशा मागण्या आंदोलकांच्या आहेत.
हेही वाचा... अमरावतीत पूरग्रस्तांच्या मदतीच्या नावाखाली अश्लील नृत्य